पनवेल

राज्यातील पत्रकारांना ‘फ्रंटलाईन वर्कर्स’चा दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करावे, सत्यमेव जयते ट्रस्ट ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पनवेल,  (वार्ताहर) ः कोरोना वैश्‍विक महामारी च्या काळात दीड वर्ष अविरत आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी सतत कार्यरत असणार्‍या पत्रकार बांधवांना फ्रंटलाईन वर्कर घोषित करण्यात यावे अशी मागणी सत्यमेव जयते ट्रस्टच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आले आहे.
सत्यमेव जयते ट्रस्टचे अध्यक्ष शितल मोरे व महाराष्ट्र राज्य सरचिटणीस योगेश कदम यांनी सदर निवेदन ई-मेल द्वारे मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. फ्रन्टलाइन वर्कर्स चा दर्जा देण्याबरोबरच त्यांनी पत्रकारांच्या इतरही मागण्यांची पूर्तता करण्याबाबत विनंतीपूर्वक निवेदन केले आहे. ज्यामध्ये सर्व दैनिक, साप्ताहिक मासिक, नियतकालिके यांच्या संपादक, छायाचित्रकार आणि पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर चा दर्जा देऊन तात्काळ मोफत लसीकरण उपलब्ध करून द्यावी तसेच पत्रकारांना कोव्हिड योद्धा म्हणून त्यांचा सन्मान करण्यात यावा. पत्रकारांना विमा संरक्षण कवच देऊन संक्रमित पत्रकारांचा शासनाच्या योजनेतून मोफत उपचार करण्यात  यावा. मुख्यमंत्री यांनी 14 एप्रिल रोजी फक्त अधिस्वीकृती धारक पत्रकारांनाच वृत्तांकन करण्याची मुभा दिली होती परंतु महाराष्ट्रात बोटावर मोजण्याइतकेच अधिस्वीकृतीधारक पत्रकार आहेत त्यामुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर अप्रत्यक्षपणे दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे ,त्यामुळे सरसकट सर्व दैनिक, साप्ताहिक, मासिक व इतर सर्व प्रकारच्या वृत्तपत्राच्या संपादक, उपसंपादक, छायाचित्रकार, पत्रकार यांना वृत्तांकन करण्याची मुभा द्यावी. तसेच दिनांक 14 एप्रिल ते आज पर्यंत अधिस्वीकृतीधारक नसलेल्या बहुतांशी पत्रकार, छायाचित्रकार यांच्यावर महाराष्ट्रात कलम 188, 269, 270 याप्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत ते तात्काळ मागे घेण्यात यावे यासाठी यासंबंधीचे आदेश गृह विभागाने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच पोलीस आयुक्त यांना तात्काळ जारी करावे. कोरोना महामारी च्या पार्श्‍वभूमीवर सर्व पत्रकार बांधवांना राज्य  सरकारने वेगळे आर्थिक पॅकेज देऊन उपाय योजना कराव्यात या सर्व बाबींचा विचार करून सरसकट सर्व पत्रकार बांधवांना फ्रन्टलाइन वर्कर्स दर्जा मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे. यापूर्वी अशी मागणी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत ,गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीच आहे.

Share This

Leave a Reply

Your email address will not be published.