संपादकीय

एक कलाकार ते पत्रकार…. खडतर प्रवास 

संपादकीय

  मूळ सांगली जिल्ह्यातील गाव, वडील पोस्ट खात्यात सेवेत असल्यामुळे जन्म मुंबईचा, त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीत माझ्या जीवनाची सुरुवात झाली. शिक्षण पूर्ण करीत असतानाच नवनवीन अभ्यास करण्यासाठी जणू काही वाचन माझ्यासोबत एका सख्यासारखेच राहिले. झगझगती दुनिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चित्रपट क्षेत्राशी मी संलग्नित झालो. त्यातच वाचनाची जोड असल्यामुळे लेखन क्षमेततही भर पडू लागली. पत्रकारितेची एक नशा जणू माझ्या अंगात भिरली होती म्हणून २००९ साली पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. जरी कला क्षेत्रात मी रमलो असलो तरीही वेळात वेळ काढून मी वृत्तपत्रांमधून लेखन करीतच होतो. लेखनासाठी माझे सोबती असलेली पुस्तके मला खूप काही शिकवून गेली.
कला क्षेत्रातील माझी कारकीर्द नावारूपाला आली ती एक यशस्वी  कलादिग्दर्शक आणि वाद्यवृंद निर्माता म्हणून.  अनेक मानाचे पुरस्कार व सन्मान मिळवले,चित्रपट सृष्टीतला सर्वोच असा मानाचा  दादासाहेब फाळके पुरस्कार मला अगदी कमी वयात भेटला. तो दिवस माझ्यासाठी सुवर्ण दिन  होता   मात्र दृष्ट लागावी अशीच काहीशी घटना माझ्यासोबत घडली. सन २०१७ साली माझी आई आजारी पडली. माझं सगळं लक्ष तिच्यासाठी वेधलं गेलं. जवळपास दीड वर्षे आईला आजारपणातून पुन्हा उभं करायचं होतं, मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळं ठरविलेलं होतं. प्रत्येक पिल्लाची आई ही आई असते, तशीच ती माझीपण आई होती. माझी आई मला या जगातून सोडून गेली, मात्र तिच्या शिकवणीने आणि तिच्या संस्काराने मला जगाचा सामना करण्याचे धाडस मिळाले. आईच्या आजारपणानंतर देशातील कोरोनाची महामारी, यामुळे कला क्षेत्रही ठप्प झाले. होते नव्हते ते सारे आईसाठी त्यागले, मात्र आईचे आशिर्वाद डोक्यावर कायम असल्यामुळे पुन्हा माझ्या आवडत्या पत्रकारिता क्षेत्राशी जुडण्याचा मी प्रयत्न केला.
गेली १२ वर्षे पत्रकारिता करीत होतो, मात्र पत्रकारितेत झोकून देण्याइतपत माझी मानसिकता तयार झाली नव्हती. आई गेल्याचे दुःख ताजे होते, त्यातच लॉकडाऊनचा बसलेला फटका, आणि यात पत्रकारिता क्षेत्रही होरपळून निघाले असले तरीही संकटांचा सामना करण्याची शिकवण अंगी असल्यामुळे पूर्ण वेळ पत्रकारितेत उतरण्याचे धाडस केले. यावेळी चांगले मित्र लाभले, ज्यांनी मला पत्रकारितेत आपल्यासोबत ठेवले. काही अडचणी निर्माण करणारेही भेटतात, मात्र मला उत्तम असे मार्गदर्शन करणारे वडीलधारे मार्गदर्शक मिळाल्यामुळे माझ्या कामात अडचणी आणणाऱ्यांचे काही चालले नाही.
गेल्या १२ वर्षांमध्ये टीव्ही ९ सारख्या चॅनलला प्रायोगिक तत्वावर काम केल्यानंतर विधानभवनात आमदार सुभाष देसाई यांच्याकडे स्वीय सहाय्यक  म्हणून काम करत धगधगती मुंबई, पोलीस टाइम्स, दिशा टीव्ही, दृष्टी टीव्हीमध्ये कामाचा अनुभव घेतला. मात्र खऱ्या अर्थाने मला असलेली पत्रकारितेची आवड पाहता दैनिक वादळवारा वृत्तपत्राने मला एक पत्रकार म्हणून जनतेत ओळख निर्माण केली. आजपर्यंत एक कलाकार म्हणून मला प्रेक्षक ओळखत होते. मात्रजनमाणसात पत्रकार म्हणून माझी ओळख निर्माण झाली ती म्हणजे दैनिक वादळवारा वृत्तसमूहाचे संपादक आमचे वडीलधारे मार्गदर्शक आदरणीय विजय कडू साहेब यांच्यामुळेच….
कला क्षेत्रातील विविध विभागात काम करीत असताना कधी वाटले नव्हते की मला खऱ्याखुऱ्या जीवनात एका पत्रकाराचा अभिनय करावा लागेल, मात्र नियतीने मला आवड असलेल्या क्षेत्रात पाय रोवण्यास माझ्या भोवताली मदत करणाऱ्यांची फळी उभी केली. आणि म्हणून रायगड संदेश या साप्ताहिकाची मी निर्मिती करू शकलो. रायगड संदेशच्या माध्यमातून चांगला संदेश देण्यासाठी  आज मी माझ्या वृत्तपत्राच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन पनवेलचे भाग्यविधाते लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त करीत असल्यामुळे मी भारावून गेलो आहे. एका महान नेत्याच्या वाढदिवसानिमित्त वृत्तपत्र सुरु करण्याची शक्ती मला प्राप्त झाली. मी या निमित्ताने सर्व वाचकांना, हितचिंतकांना वचन देतो, की मी माझ्या वृत्तपत्रात कोणावर अन्याय होईल असे लिखाण करणार नाही, नाहक कोणाची बदनामी होईल असे शब्द टाळण्याचा प्रयत्न करिन, अन्यायाला वाचा फोडायची आहे, त्यामुळे जर कोणी वृत्तपत्राच्या आड आला तर मात्र त्याचा खरपूस समाचार या वृत्तपत्रातून घेतला जाईल. आज सुरु करीत असलेल्या रायगड संदेश या साप्ताहिकाला आपल्या कडून सहकार्याची, प्रेमाची, आशीर्वादाची अपेक्षा आहे, आपण ती द्यावी हीच प्रार्थना !

Share This

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *