पनवेल

भागवत सोनवणे पनवेलचे नवे सहाय्यक पोलीस आयुक्त सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले-पाटील यांनी सुपूर्द केला पदभार

पनवेल / साहिल रेळेकर

नवी मुंबई पोलीस आयुक्त, सह आयुक्त, पोलीस उपायुक्त तसेच सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या सहकार्याने पनवेल परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सदैव कटिबद्ध राहीन असे प्रतिपादन पनवेलचे नवे सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे यांनी केले. ते पनवेल येथे सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाचा पदभार स्वीकारताना बोलत होते. पनवेलचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन-भोसले पाटील यांच्या सेवाकार्याचा कालावधी संपल्याने सोमवारी ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर पनवेल येथील सहाय्यक पोलीस आयुक्त पदाचा पदभार त्यांनी नवे सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे यांच्याकडे सुपूर्द केला.
भागवत सोनवणे यांनी यापूर्वी मुंबई, नागपूर, नाशिक, नांदेड, जालना, बुलढाणा, अमरावती तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पोलीस विभागात अत्यंत तत्परतेने व प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावले आहे. अल्पावधीतच त्यांनी अनेक प्रकरणांचा यशस्वीरीत्या तपास केल्याने त्यांच्या कामगिरीबद्दल अनेकवेळा वरिष्ठांनी त्यांचे कौतुकही केले आहे.
गेली ३३ वर्षे, ११ महिने व १६ दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावरून नितीन भोसले पाटील हे पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाले. कोल्हापूर या त्यांच्या मूळ गावातुन ते पोलीस खात्यात भरती झाले. त्यांच्या कारकिर्दीत मुंबई, नवी मुंबई, पुणे शहर, पुणे ग्रामीण, अमरावती, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नितीन भोसले-पाटील यांनी पोलीस विभागात सेवा बजावली आहे. अत्यंत प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभाव; परंतु वेळ पडल्यास गुन्हेगारीबाबत कर्तव्यकठोरता.! अशी नितीन भोसले पाटील यांची पोलीस विभागात विशेष ओळख होती.
पनवेलमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्तपदी कार्यरत असताना अत्यंत कमी वेळात त्यांनी अनेक प्रकरणांचा छडा लावला. गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. कोरोनाच्या काळात वृद्धाश्रम, अनाथ आश्रम, गोर-गरिबांसाठी वेळोवेळी दिलेला मदतीचा हात तसेच त्यांनी केलेले समाजोपयोगी कार्य विशेष उल्लेखनीय आहे.
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, पोलीस सहआयुक्त डॉ.जय जाधव, परिमंडळ-२चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले पाटील यांच्या भावी आयुष्यासाठी आणि नवे सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. दरम्यान सोमवारी संध्याकाळी सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात नितीन भोसले पाटील यांना निरोप देण्यासाठी तसेच भागवत सोनवणे यांचे स्वागत करण्यासाठी कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, कोपरखैरणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार, सिबीडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कोट:
१) ३३ वर्षांच्या कालावधीत सेवा बजावताना उत्तम वरिष्ठ अधिकारी लाभले हे माझे भाग्य समजतो. मला वेळोवेळी सर्व सहकाऱ्यांनी चांगले सहकार्य केले त्यांचेही आभार मानतो. वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे कर्तव्य बजावताना मोलाची साथ मिळाली. माझ्यासोबत काम केलेले सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी नेहमीच मला समजून घेतले आणि साथ दिली त्यामुळे सेवानिवृत्त होताना समाधान वाटत आहे. तसेच माझ्या कुटुंबाने मला वेळोवेळी साथ दिली त्यांचेही मनापासून आभार मानतो.
– नितीन भोसले पाटील (सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त, पनवेल)

२) पनवेल विभागात गुन्हेगारी प्रवृत्तीला ठेचण्यासाठी सदैव कटीबद्ध राहीन. पनवेल परिसरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था कशा पद्धतीने टिकून राहील यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहीन. वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांनुसार कर्तव्य बजावताना कोणावरही अन्याय होणार नाही. सर्व नागरिकांनी निर्भयपणे राहावे. सर्व नागरिकांच्या रक्षणासाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर आहे.
– भागवत सोनवणे (सहाय्यक पोलीस आयुक्त,पनवेल)

Share This

Leave a Reply

Your email address will not be published.