पनवेल

वीज उद्योगातील सर्व कर्मचारी व इंजिनिअर्सच्या संघटनांनी येत्या १० ऑगस्ट रोजी दिली देशव्यापी संपाची हाक

पनवेल / प्रतिनिधी 

उद्योगातील सर्व कर्मचार्‍यांच्या व इंजिनिअर्सच्या संघटनांनी देशव्यापी संपावर येत्या १० ऑगस्ट रोजी जाणार असल्याची हाक दिली असून या संदर्भातील नोटीस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व ऊर्जामंत्री आर.के.सिंग यांना दिल्याची माहिती आज पनवेल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते व अधिकारी राज्य स्तरिय संघर्ष समितीतर्फे देण्यात आली.
यावेळी ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रीसिटी एम्प्लॉईजचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ.कृष्णा भोयर, सरचिटणीस संजय ठाकूर, इंटकचे नेते वैभव पाटील, महिला आघाडीच्या भारती भोईर, प्रथमेश पाटील, दत्तात्रेय कांबळे, गोरखनाथ पवार, सुयोग पाटील, सतीश पाटील, अतुल चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांगितले की, देशातील 15 लाख कर्मचारी, अभियंते व अधिकारी येत्या १० ऑगस्ट रोजी सुधारित विद्युत कायदा-२०२१ हा संसदेत पास करण्यात येणार आहे. त्याला विरोध म्हणून आम्ही संपावर जात आहोत. यात महाराष्ट्रातील २६ संघटना या महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते व अधिकारी, राज्यस्तरिय संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली संपावर जाणार आहेत. कारण येणारा कायदा हा खाजगी करणासाठी पोषक असून तो सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारा आहे. आज जी सेवा ग्राहकांना आमच्यामार्फत मिळत आहे ती सेवा ग्राहकांना खाजगीकरणामार्फत मिळणार नाही, याचा मोठा परिणाम ग्राहकांना बसणार आहे. तसेच यांच्या मनमानी कारभारामुळे मोठा फटका ग्राहकांना सहन करावा लागणार आहे. हे सर्व टाळण्यासाठी येत्या १० ऑगस्ट रोजी ग्राहकांनी आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष कॉ.कृष्णा भोयर यांनी यावेळी केले. या संदर्भात आम्ही केंद्र शासनाशी बोलणी करत असून कोणत्याही परिस्थितीत हा ठराव पास करून देणार नाही, याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. याला वीज ग्राहकांनी सुद्धा पाठींबा द्यावा व खाजगीकरण रोखावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

Share This

Leave a Reply

Your email address will not be published.