पनवेल/ प्रतिनिधी
करोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लागू केलेल्या मनाई आदेशाचा भंग करुन कांदा बटाटा मार्केट मधील एपीएमसीच्या मुख्य कार्यालयासमोर बेकायदेशीररीत्या आंदोलन करणार्या महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे प्रमुख पदाधिकाऱयांसह दिडशे मापाडी कामगांराविरोधात एपीएमसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट व जनरल कामगार युनियनचे संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, शाम ढमाले, गजानन कुरडे, सुशीलकुमार गावडे, मधुकर जाधव, रविंद्र माने या प्रमुख पदाधिकाऱयांचा समावेश आहे.
सध्या राज्यात करोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. लोकांनी करोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात येऊ नये यासाठी सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यासाठी शासनाकडून व नवी मुंबई पोलिसांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. असे असतानाही महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट व जनरल कामगार युनियनच्या पदाधिकाऱयांनी गत सोमवारी एपीएमसी मार्केट मधील मापाड्यांच्या मागण्यांसदर्भात कांदा बटाटा मार्केटमधील एपीएमसीच्या मुख्य कार्यालयासमोर विनापरवानगी आंदोलन केले. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट व जनरल कामगार युनियनचे संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, शाम ढमाले, गजानन कुरडे, सुशीलकुमार गावडे, मधुकर जाधव, रविंद्र माने या प्रमुख पदाधिकाऱयांसह सुमारे दिडशे मापाडी कामगार सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी करोना या संसर्गजन्य आजाराच्या प्रसाराच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना केले नसल्याचे तसेच त्यांनी सामाजिक अंतर न बाळगता, तसेच मास्क न लावता गर्दी केल्याचे आढळुन आले. त्यामुळे एपीएमसी पोलिसांनी संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्यांसह सुमारे दीडशे मापाड्यांविरोधात शासनाच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तसेच साथरोग प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.