पनवेल

पनवेल महापालिका क्षेत्रात समुह राष्ट्रगीत गायन उपक्रमास प्रचंड प्रतिसाद

पनवेल / प्रतिनिधी 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्यात ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत आज (७ ऑगस्ट २०२२ ) ‘समूह राष्ट्रगीत गायन’ उपक्रम सकाळी ११.०० ते ११. ०१ या एका मिनिटांमध्ये एकाच वेळी पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी राबविण्यात आला. प्रशासक तथा आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिका हद्दीमध्ये हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र ” स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ” साजरा केला जात आहे. या अंतर्गतच महाराष्ट्र शासनाच्यावतीने 9 ऑगस्ट ते 17ऑगस्ट दरम्यान ‘स्वराज्य महोत्सव’उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये घरोघरी तिरंगा, रॅली, फाळणी वेदना स्मृतीदिनानिमित्त प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन महापालिकेच्यावतीने करण्यात आले. आज (७ ऑगस्ट २०२२ ) ‘समूह राष्ट्रगीत गायन’ उपक्रम सकाळी ११.०० ते ११. ०१ या एका मिनिटांमध्ये एकाच वेळी पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील महापालिका मुख्यालय, चारही प्रभागातील मॉल्स, शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, मंदिरे अशा विविध ठिकाणी राबविण्यात आला. यासाठी महापालिकेच्यावतीने अधिकारी, कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या.
ओरियन मॉल पनवेल येथे प्रशासक तथा आयुक्त श्री.गणेश देशमुख, उपायुक्त श्री. विठ्ठल डाके, तहसिलदार विजय तळेकर , कार्यकारी अभियंता संजय कटेकर, ओरियन मॉलचे मंगेश परूळेकर तसेच मॉलमध्ये आलेले नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फुर्तपणे या उपक्रमात सहभाग नोंदविला. पनवेलमधील पालिका मुख्यालय, वडाळा तलाव, साई बाबा मंदिर, एमजीएम रूग्णालय कामोठे, चारही प्रभागातील डिमार्ट, बाजारपेठा, खारघरमधील लिटल वर्ल्ड मॉल,चौक, सोसायट्या अशा अनेक ठिकाणी नागरिकांनी अकरा वाजता उभारून राष्ट्रगीत गायले. तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांनी घंटागाडी ज्या ज्या विभागात उभी आहे अशा 80 ठिकाणी नागरिकांना एकत्रित करून ‘समूह राष्ट्रगीत गायन’ उपक्रमामध्ये सहभाग घेतला. अशा पध्दतीने महापालिकेच्या माध्यमातून जवळपास 100 हून अधिक ठिकाणी ‘समूह राष्ट्रगीत गायन’ उपक्रम राबविण्यात आला. महापालिका क्षेत्रातील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, पदवी महाविद्यालये अशा सुमारे 250 शालेय संस्थाच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. तसेच खाजगी आस्थापना, शासकीय आस्थापना, विविध संस्थांची कार्यालये असे सर्व मिळून सुमारे 300 हून अधिक ठिकाणी महापालिका कार्यक्षेत्रात ‘समूह राष्ट्रगीत गायन’ उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांनी राष्ट्रभक्तीचे दर्शन घडविले. महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

Share This

Leave a Reply

Your email address will not be published.