पनवेल

विवाहितेला ब्लॅकमेल करणाऱ्याला खारघर पोलिसांनी हिमाचल प्रदेशमध्ये जाऊन केली अटक 

पनवेल / वार्ताहर

सोशल मिडीयावर अश्लिल फोटो व्हायरल करण्याची भिती दाखवून खारघर मधील विवाहितेकडून तब्बल १२ लाख ५८ रुपये किंमतीचे दागिने आणि रोख रक्कम उकळून सदर विवाहितेला धमकावून तिच्याकडून आणखी रोख रक्कम घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका खंडणीखोराला खारघर पोलिसांनी हिमाचल प्रदेशमध्ये जेरबंद केले आहे. नवीन श्यामदेव कश्यप (२४) असे या खंडणीखोराचे नाव असून मागील काही महिन्यापासून तो सदर विवाहितेला त्रास देत होता.

सदर घटनेतील २५ वर्षीय विवाहिता खारघरमध्ये आपल्या कुटुंबियासह राहण्यास आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये या विवाहितेची मिनाक्षी नामक महिलेसोबत इन्स्टाग्रामवरुन ओळख झाली होती. त्यानंतर या दोघींमध्ये घनिष्ठ मैत्री झाल्यानंतर मिनाक्षीने तक्रारदार विवाहितेला आपले अश्लिल फोटो पाठवून तिच्याकडून तिचे अश्लिल फोटो मागवून घेतले. त्यानुसार या विवाहितेने देखील मिनाक्षीला आपले नग्न अवस्थेतील फोटो पाठवून दिले. मात्र, त्यानंतर मिनाक्षीने या विवाहितेचे आश्लिल फोटो तिचे मित्र सचिन मिना आणि नवीन कश्यप या दोघांना पाठवून दिले. त्यानंतर सचिन आणि नवीन या दोघांनी सदर विवाहितेला तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या दोघांनी सदर विवाहितेसोबत मैत्री केली. काही महिन्यांपूर्वी आरोपी नवीन कश्यप नवी मुंबईत खारघर येथे तिला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याने विवाहितेला कोल्ड्रींक्स मधून नशेचे पेच पाजून तिच्यासोबत अश्लिल चाळे करतानाचे फोटो काढून घेतले. त्यानंतर नवीन कश्यप याने त्याच्या सोबतचे अश्लिल फोटो आणि मिनाक्षीने पूर्वी त्याला दिलेले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. तसेच पोलिसांकडे तक्रार केल्यास तिच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देखील त्याने दिल्याने सदर विवाहितेने घाबरुन आपल्या पतीला याबाबत माहिती न देता घरातील सर्व दागिने नवीन कश्यपला देऊन टाकले. आरोपी नवीन कश्यप याने सदर विवाहितेला ब्लॅकमेल करून तिच्याकडून तब्बल १२ लाख ५८ हजार रुपये किंमतीचे दागिने आणि रोख रक्कम उकळले खर पण यानंतर देखील त्याने विवाहितेचे नग्न फोटो आणि त्याच्यासोबतचे अश्लिल फोटो व्हारल करण्याची धमकी देऊन तिच्याकडे आणखी पैसे मागण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्रस्त झालेल्या या विवाहितेने ऑगस्ट महिन्यात याबाबतची माहिती आपल्या पतीला देऊन खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. खारघर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तत्काळ तीन आरोपींविरोधात आयटी अॅक्ट सह खंडणी, विनयभंग, धमकावणे अशा विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी खंडणीखोराच्या मोबाईलवर वॉच ठेवून त्याचा ठावठिकाणी शोधला. त्यानुसार नवीन कश्यप हिमाचल प्रदेशात असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हिमाचल प्रदेश येथे पोलीस पथक पाठविण्यात आले होते. या पथकाने आरोपी नवीन कश्यप याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.

Share This

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *